महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तब्बल २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर कारवाई केली आहे. यापुढे संपूर्ण अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ६ अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर कारवाई करण्यात येऊन अंदाजे ५,५०० चौ.फुट क्षेत्र पाडण्यात आले. या कारवाईमध्ये २० एमएसएफ जवान सहभागी होते.
तसेच, कारवाईसाठी २ जेसीबी यंत्रणांचा वापर करण्यात आला. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात ११ अनधिकृत वीटबांधकामे आणि पत्राशेडवर कारवाई करून अंदाजे १६,००० चौ. फुट क्षेत्र पाडण्यात आले. या कारवाईसाठी क्षेत्रीय अधिकारी, ३ अतिक्रमण अधीक्षक, ८ बीट निरीक्षक, १० पोलीस कर्मचारी आणि १५ मजूर उपस्थित होते.
या कारवाईसाठी २ जेसीबी आणि १ ट्रॅक्टर ब्रेकरची यंत्रणा वापरण्यात आली. त्याचप्रमाणे, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात १० अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून, अंदाजे १६,४०० चौ. फुट क्षेत्र पाडण्यात आले आहे.
या कारवाईसाठी ४ क्षेत्रीय अधिकारी, १ अतिक्रमण अधीक्षक, ६ बीट निरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी आणि १५ मजूर उपस्थित होते, तसेच २ जेसीबी यंत्रणा वापरण्यात आली.
