पाच कामगार गंभीर : अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येवलेवाडीत रविवारी काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर पाच कामगार गंभीर जखमी झाले.
येवलेवाडी येथे दुपारी दीड वाजता एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना हा अपघात झाला. काच उतरवताना काचा असलेले बॉक्स अंगावर पडून कामगार अडकले. क्रेनच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
त्यात ४ कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. एक जखमी असल्याची माहिती अग्निशमन दलाचे समीर शेख यांनी दिली आहे. अपघात झाला. अमित शिवशंकर कुमार (वय २७), विकास सर्जू प्रसाद गौतम (वय २३), पवन रामचंद्र कुमार (वय ४४, तिघेही मूळ रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०, मूळ आणि रा. अमेठी, उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
कारखान्यात परदेशातून मोठ-मोठ्या काचा आणल्या जातात. या काचांवर प्रक्रिया करून, त्या पुन्हा विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जातात. त्यानुसार रविवारी दुपारी एकच्या सुमारास बाहेरून आलेल्या काचा कंटेनरमधून कारखान्यात उतरविल्या जात असताना ही दुर्घटना घडली. सुमारे १५ कामगार तेथे काम करीत होते.
‘दहा मिमी’ जाडी आणि दोन टन वजनाची एक काच,अशा सुमारे आठ काचा कंटेनरमध्ये होत्या. वाहतुकीदरम्यान त्या काचा सुरक्षित राहाव्यात, यासाठी ‘सेफ्टी बेल्ट’ लावण्यात आले होते. कंटेनरमधून काच काढण्यास सुरुवात करताना ते ‘सेफ्टी बेल्ट’ तुटले. त्यामुळे दोन काचा कामगारांच्या अंगावर पडल्या.
कामगारांची सुटका करताना क्रेनची मदत घ्यावी लागली. या दुर्घटनेत मृत पावलेल्या चार पैकी दोन कामगारांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर जखमा आहेत. तर, दोघांच्या अंगावर किरकोळ जखमा आहेत.
त्यामुळे त्यांचा मृत्यू गंभीर जखमी होऊन झाल्याची शक्यता कमी असून, जास्त वजनाचा दबाव किंवा गुदमरून मृत्यू झाला असण्याची प्राथमिक शक्यता ससूनमधील डॉक्टरांनीवर्तवली आहे, अशी माहिती कोंढवा पोलिस स्टेशनचे निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिस दाखल झाले.
या प्रकरणात चार कामगारांचा मृत्यू झाला असून, इतर कामगारांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटना कशी घडली व यात कोण दोषी आहे, याचा तपास सुरू आहे. अशी माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.
काच कारखान्यात काच उतरवत असताना काचा असलेले बॉक्स अंगावर पडून त्याखाली कामगार अडकले होते. क्रेनच्या साह्याने आमच्या जवानांनी कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. दुर्दैवाने यात चार कामगारांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती अग्निशामक दलाचे स्टेशन ड्युटी ऑफिसर, समीर शेख यांनी दिली.

