महाराष्ट्र शासनाचा आध्यादेश : नागरिकांकडून स्वागत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता-गोमाता” म्हणून घोषीत करण्यास राज्य शासनातर्फे मान्यता देण्यात आली आहे.
प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनात गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचं धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना “कामधेनू” असं संबोधलं जातं.
राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात (उदा. मराठवाडा विभागात- देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात-खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात-डांगी तर विदर्भात – गवळाऊ. तथापि, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी आवश्यक अन्नघटक उपलब्ध असल्यामुळे ते एक संपूर्ण अन्न मानले जाते.
देशी गायींच्या दुधाचे आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीतील पंचगव्याचा वापर, तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता, देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर, पशुपालकांना देशी गायींचे पालन-पोषण करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने देशी गायींना “राज्यमाता-गोमाता” घोषित करण्याचा शासनाचा विचार होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गायीची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा
राज्य शासनाने राज्यमाता गोमाता हा निर्णय घेतला आहे याचे मी सर्व प्रथम गौ प्रेमी म्हणून स्वागत करतो. शासनाच्या या निर्णया मुळे गायचे काय महत्त्व आहे हे सर्व स्तरा पर्यंत अजून प्रखरतेने पोहचेल. गायी मध्ये सर्व ब्रम्हांड आहे. गायीची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे.
– ओमप्रकाश रांका
उद्योगपती पुणे

