लोणीकंद पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणीकंद पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावर कारवाई करत, जबरी चोरी करणाऱ्या दोघांकडून १ वाहन, १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. लोणीकंद पोलिसांनी मागील ३० दिवसांत ८ देशी बनावटीची पिस्तुल आणि २६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये वाहनचालकाला मारहाण करून लूट करण्याचा गुन्हा दाखल होता. फिर्यादी हे गाडीने नगरकडून पुण्याकडे येत असताना, आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून त्यांचा मोबाईल आणि गाडी जबरीने चोरी करून नेली होती.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना, दि. २८ सप्टेंबर रोजी पहाटे पोलीस नाईक स्वप्निल जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, आणि पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, साईनाथ रोकडे, विशाल गायकवाड यांनी बांगर वस्ती रोड, केसनंद येथे सापळा लावला.
पोलिसांनी सचिन राजाराम ढोरे (वय ३८ वर्षे, रा. ढोरे वस्ती, मौजे केसनंद, ता. हवेली) आणि मंथन दत्तात्रय धुमाळ (वय २६ वर्षे, रा. साईनगर, खराडी, चंदननगर) यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली १ कार, १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे, असा एकूण ५,२३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत आहेत. लोणीकंद पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली मागील ३० दिवसांत ८ देशी बनावटीची पिस्तुल आणि २६ जिवंत काडतुसे जप्त करून पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यात मोठी कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पंडीत रेजितवाड, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, सागर जगताप, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, दिपक कोकरे, सुधीर शिवले, विशाल गायकवाड, प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी केली आहे.


















