महावीर प्रतिष्ठान येथे चातुर्मास: भाविकांची दर्शनासाठी रीघ
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आध्यात्मिक चातुर्मास कल्प २०२४, साधना सदन संघ अंतर्गत, प. पू. श्री गौतममुनिजी म. सा. आणि प. पू. चेतनमुनिजी म. सा. यांचा चातुर्मास महावीर प्रतिष्ठान येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. संपूर्ण देशभरातून भक्तगण गुरु महाराजांचे दर्शन आणि धर्म आराधना ऐकण्यासाठी येत आहेत. या शृंखलेत गुरुदेव प. पू. गौतममुनिजी म. सा. यांचा ५० वा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी साधना सदन संघाचे सर्व पदाधिकारी तसेच पुणे सकल संघ आणि पुणे व पिंपरी चिंचवड संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, वैजापूर, शिरूर, भाईंदर, शिरपूर, दिल्ली, बडोदा, मेरठ अशा अनेक शहरांमधून आणि संघांमधून शेकडो श्रावक जन्मदिवस साजरा करण्यासाठी आणि भविष्यातील चातुर्मासासाठी विनंती करण्यासाठी उपस्थित होते.
सुखसागर श्रावक संघामध्ये प. पू. गौरवमुनिजी म. सा. यांचा चातुर्मास चालू आहे, आणि तेही गौतममुनिजी म.सा. यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. ५०व्या जन्मोत्सवामध्ये अनेक भाविकांनी गुरुदेवांविषयी आपली भावना व्यक्त केली.
विविध मंडळे व संघांनी भजन व मनोगत सभेसमोर सादर केले. विशेषत: महावीर प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम शाळेचे प्राध्यापक व शिक्षकांनी एक सुंदर भारूड सादर केले. गुरुदेवांनी २०२५ चा चातुर्मास शिरूर श्रावक संघ येथे होणार असल्याचे जाहीर केले.
पूज्य गुरुमहाराजांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनचा इतिहास सभेसमोर मांडला. त्यांनी सांगितले की, “मी आज तुमच्या समोर उभा आहे, ते आई-वडिलांचे संस्कार, गुरुजनांची शिकवण, प. पू. चेतनमुनिजी म. सा. यांची साथ आणि संघ व समाजाने दिलेला विश्वास, आदर, सन्मान यामुळेच आहे.”
याचबरोबर संघाकडून जपाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शेकडो जोडप्यांनी सहभाग घेतला. गादीया परिवाराच्या सहकार्यातून हा सोहळा पार पडला, ज्यात औरंगाबाद व पुणे येथील स्व. खिवराजजी दगडुरामजी गादीया, स्व. चंचलाजी खिवराज गादीया आणि स्व. गिरीश खिवराज गादीया यांच्या स्मरणार्थ गादीया परिवाराच्या सहकार्यातून हा सोहळा पार पडला.
यावेळी संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, कार्याध्यक्ष विजय भंडारी, वरिष्ठ उपाध्यक्ष वालचंद संचेती, उपाध्यक्ष लखीचंद खिवंसरा, विजय धोका, राजश्री पारख, पन्नालाल लुणावत, मंत्री आदेश खिवंसरा, सहमंत्री प्रदीप मुधा, कोषाध्यक्ष अरुण शिंगवी, सह-कोषाध्यक्ष नितीन ओस्तवाल आदीं सह साधना सदन, सादडी सदन व मेवाड संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती संघाचे मंत्री आदेश खिवंसरा यांनी दिली.















