महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी, म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, आणि निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रे असून, निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.
तहसील कार्यालय भूम येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भूम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, डी.वाय.एस.पी. गौरीप्रसाद हिरेमठ, तसेच तहसीलदार जयंत पाटील यांनी निवडणूक तयारीची माहिती दिली.
२४३-परंडा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रे असून एकूण मतदारसंख्या ३७९,६०३ आहे. त्यामध्ये १,७४,७६१ पुरुष मतदार, १,५४,८३६ स्त्री मतदार, आणि ६६६० असे ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार आहेत.
याशिवाय, ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या ६ आहे आणि सैनिक मतदार ७७६ आहेत. मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी SST पथके १० तैनात असतील. तसेच, FST पथके (पोलिस स्टेशन निहाय) भूममध्ये ४, परंडामध्ये २, आंभीमध्ये २ आणि वाशीमध्ये २ असतील. राखीव म्हणून ६ पथके ठेवण्यात आली आहेत.















