डॉ. नलिनी जोशी : अरिहंत जागृती मंचातर्फे व्याख्यानाचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारतातील सर्व प्राकृत भाषांमध्ये जैन आचार्यांनी विपुल साहित्य लिहिले आहे आणि त्या लिखाणामुळे भाषांना अभिजात दर्जा मिळण्यास आधार मिळाला आहे. असे मत प्राकृत इंग्रजी महाशब्दकोशाच्या मुख्य संपादक डॉ. नलिनी जोशी यांनी व्यक्त केले.
मराठी, प्राकृत व इतर काही भाषांना नुकताच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर श्री वर्धमान श्र्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, साधना सदन, पुणे आणि अरिहंत जागृती मंचातर्फे आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
प. पु. गुरुदेव श्री गौतममुनीजी म. सा. यांच्या आशीर्वचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अरिहंत जागृती मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांनी सांगितले की, जैन धर्म हा एक प्राचीन स्वतंत्र भारतीय धर्म आहे आणि तो कोणत्याही धर्माची शाखा नाही, याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या मुख्य उद्दिष्टाने मंच कार्य करीत आहे.
डॉ. नलिनी जोशी म्हणाल्या की, आजच्या भारतीय भाषांचा उगम प्राकृत भाषांमध्ये आहे आणि या भाषांमध्ये मानवी जीवन समृद्ध करणारी व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी उज्ज्वल साहित्य संपदा आहे.
रोजच्या बोलण्यातील, साध्या जगण्यातील भाषा म्हणजे प्राकृत भाषा आहेत. एखादी भाषा अभिजात (क्लासिकल) असण्यासाठी ती उदात्त, उन्नत असावी, तिला 1500 ते 2000 वर्षांची परंपरा असावी आणि त्या भाषेत केवळ धार्मिकच नव्हे, तर तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब पडेल इतके विपुल साहित्य असावे.
प्राकृत ही एक भाषा नसून पाली, अर्धमागधी, महाराष्ट्री इ. अनेक बोली भाषांचा समूह म्हणजे प्राकृत होय, अशी माहिती त्यांनी दिली. जैनांचे प्राकृत साहित्यातील योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगून भगवान महावीर यांच्या काळापासून आतापर्यंत झालेल्या प्राकृत भाषांचा कालपरत्वे आलेला आलेख त्यांनी मांडला.
एकूण प्राकृत साहित्यात ८०% जैन आचार्यांचे योगदान आहे, ते विसरून चालणार नाही, असे डॉ. जोशी म्हणाल्या. जैन साहित्याचा गौरवपूर्ण इतिहास अनेक संदर्भ आणि उदाहरणे देऊन डॉ. जोशी यांनी सादर केला.
यात विविध ग्रंथ, त्यांचे लेखक, त्यांचा कालखंड, प्रत्येक ग्रंथाचे महत्त्व, तत्कालीन भाषा विशेष असे विविध पदर उलगडत त्यांनी प्राकृत जैन साहित्याचा प्रवाह चित्रपटासारखा मांडला. भाषेचे बदलते प्रवाह, मागधी उपभाषा, इसवी सनाच्या टप्प्यावर बदलत जाणारी भाषा, जैन धर्मातील विविध पंथांनी साहित्य लेखनासाठी स्वीकारलेल्या नानाविध भाषा, भाषेत शिरलेले अपभ्रंश लिखाण याचा आढावा डॉ. जोशी यांनी व्याख्यानात घेतला.
यावेळी श्रुतदीप रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्राचीन जैन साहित्याचे संवर्धन करणे आणि त्यात युवकांचा सहभाग असणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यासाठी पुण्यात श्रुतदीप रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या प्राचीन जैन हस्तलिखितांचे डिजीटायझेशन ह्या महत्त्वपूर्ण कार्याची त्यांनी माहिती दिली. महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकांत कोठारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाल ललवाणी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजय पारख आणि नितीन शहा यांनी करून दिला. अभय ललवाणी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय चोरडिया, संतोष भन्साळी, प्रदीप फिरोदिया, अमित जोगी, ईश्वर भुरट, अजित पांढरे, संकेत मुनोत, अमित नहार, अजय ललवाणी, शांतीनाथ जैन, जवाहर गुमते, नितीन जैन, शांतीलाल नवलखा यांनी विशेष प्रयत्न केले. अरिहंत जागृती मंचाने आयोजित केलेल्या या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.















