आयकर विभागाने घेतली रोकड ताब्यात : पुण्यातून सातारा कडे जात होती गाडी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचे भरारी पथक विविध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करत असताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटींची रोकड जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही रोकड इनोव्हा क्रिस्टा कारमध्ये होती.आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका खासगी वाहनात कोट्यवधीची रोकड सापडल्याचं उघड झालं आहे. ही रक्कम सातारा शहराच्या दिशेने नेण्यात येत होती.
सध्या पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी या प्रकाराचा तपास करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या रोकडमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ही रक्कम जवळपास 5 कोटी असल्याचा अंदाज आहे.
पुणे-सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम नेली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी दुपारपासून पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्याजवळ नाकाबंदी केली होती.
रात्रीच्या सुमारास एक संशयित वाहन पोलिसांना आढळले. पोलिसांनी ते वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. सध्या खेड शिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे.
