समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : समर्थ पोलिसांना चोरट्यांकडून ४ दुचाकी आणि ६ मोबाईल जप्त करण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात फिर्यादी यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल चोरीला गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अमलदार दाखल गुन्ह्यातील चोरी गेलेले वाहन तसेच चोरट्यांचा शोध घेत असताना, पोलीस अमलदार शेख, गावडे, घोरपडे यांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेयांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त माहितीच्या मदतीने तपास पथकातील पोलीस अमलदारांनी चोरी गेलेल्या वाहनाचा शोध घेतला.
सारस्वत कॉलनी परिसरात ते आले असता, तेथे दोन इसम दोन दुचाकींवरून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आढळले. या इसमांचा पाठलाग करून त्यांना थांबवून त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहनांबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आणि समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आणले.
पुढील चौकशीत त्यांनी इतर साथीदार सुशांत ऊर्फ बंटी बाबुराव शिंदे व एक विधी संघर्षित बालक यांच्या मदतीने दुचाकी वाहनांची चोरी केल्याचे उघड झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती खालीलप्रमाणे आहे : १) अविनाश पप्पू अडसुळे (वय १८ वर्षे ८ महिने), (रा. कोल्हापुरकर यांची खोली, यशोदीप चौकाजवळ, वारजे माळवाडी, पुणे), २) सुशांत ऊर्फ बंटी बाबुराव शिंदे (वय १८ वर्षे ४ महिने), (रा. यशोदीप चौकाजवळ, वारजे माळवाडी, पुणे).
आरोपींनी दोन विधी संघर्षित बालकांसह वारजे माळवाडी परिसरात तसेच समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणखी काही दुचाकी वाहने आणि मोबाईल फोन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ४ दुचाकी वाहने, ६ मोबाईल फोन, १ कॉलेज बॅग व पाकीट आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
यामध्ये वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १ वाहन चोरीचा गुन्हा तसेच समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ३ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. सदरची कामगिरी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहाय्यक पोलीस फौजदार पागार, पोलीस अमलदार इम्रान शेख, रोहीदास वाघेरे, रविंद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, अर्जुन कुडाळकर यांनी ही कामगिरी बजावली.
