डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने गहाळ झालेले ₹ ५,४०,००० किंमतीचे ३० मोबाईल हस्तगत केले आहेत.
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळवण्यासाठी (Central Equipment Identity Register – CEIR) ही प्रणाली सुरू केली होती. केंद्र सरकारच्या CEIR प्रणालीचा वापर करून डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर विभागाचे प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, महिला पोलीस अंमलदार उमा पालवे, सरोजा देवर, सुप्रिया सोनवणे यांच्या टीमने वेगवेगळ्या राज्यांत तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हरवलेले मोबाईल चालू असल्याची माहिती मिळवली.
सायबर टीमने हरवलेल्या मोबाईलची माहिती संकलित करून, त्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एका महिन्यात नागरिकांचे ५,४०,००० रु किंमतीचे ३० मोबाईल हस्तगत केले.
ही कामगिरी डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या सूचनांनुसार सायबर पथकाचे महिला पोलीस अंमलदार उमा पालवे, सुप्रिया सोनवणे, सरोजा देवर यांच्या पथकाने केली आहे.