महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. यंदाही त्या भाजपच्या उमेदवार आहेत. मात्र, यंदा या मतदारसंघात तब्बल १५ अपक्षांसह २० उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी अश्विनी कदम नावाच्या तीन उमेदवारांच्या उपस्थितीमुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघावर आहे.
पर्वती हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा असला, तरी पुण्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या जैन समाजाची ५० ते ६० हजार एकगठ्ठा मते निर्णायक ठरू शकतात. याची जाणीव असल्याने जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते भरत सुराणा यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
त्यांचे संघटन कौशल्य चांगले असल्याने त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. या मतदारसंघात मुख्य लढत महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम, भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, व संभाजी ब्रिगेडचे उमेदवार अविनाश अशोक घोडके यांच्यात होणार आहे, असे चित्र सध्या दिसते. काँग्रेसचे आबा बागुल यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
चार नोव्हेंबर रोजी माघारीचा दिवस आहे; त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. इतर १७ उमेदवार सध्या तरी रिंगणात आहेत, कारण त्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सुरेखा गायकवाड, आरपीआयच्या रवींद्र क्षीरसागर, आणि अपक्ष म्हणून अर्चना गव्हाणे, अर्जुन शिरसाट, अशपाक मोमीन, अश्विनी अनिल कदम, अश्विनी खैरनार, अश्विनी नितीन कदम, उल्हास बागुल, कविता पटेकर, नितीन मधुकर कदम, भरत बस्तीमलजी सुराणा, याबेस उर्फ अमोल तुजारे, ललिता तंगीराला, शतायू भगळे, सचिन तावरे, सुहास बनसोडे हे इतर १५ अपक्ष उमेदवार उभे आहेत.
३ अश्विनी कदम निवडणुक रिंगणात – भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या विरोधात अश्विनी नितीन कदम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. मागील वेळीही त्या लढल्या होत्या, मात्र यंदा त्यांच्या नावाच्या आणखी दोन महिला उमेदवारही आहेत. यातील एकीचे नावही अश्विनी नितीन कदम आहे. त्या हिंगणे खुर्द येथील असून अपक्ष उमेदवार आहेत. तिसऱ्या उमेदवार अश्विनी अनिल कदम या जनता वसाहत येथील असून त्याही अपक्ष आहेत. तीन उमेदवारांच्या अश्विनी कदम या नावाने मतदारांचा गोंधळ उडून त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, अशी चर्चा आहे. याशिवाय अश्विनी खैरनार ह्या देखील रिंगणात आहेत.
पर्वती (२१२) – मिश्र लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी येथे सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीत (२०१९) त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांचा ३६,७६७ मतांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ५८ हजार ९०० आहे. त्यात पुरुष मतदार १,८२,३०७ आणि महिला मतदार १,७६,४९७ आहेत. ट्रान्सजेंडर मतदार ९६ आहेत.

