हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ज्योती धनाजी खंकाळ (वय ३८, रा. ढेरे बंगला, मांजरी) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी घुले कॉलनीतील ४३ वर्षीय महिलेने हडपसर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १८ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची १४ वर्षांची मुलगी दहावीत शिकत आहे. आरोपी महिलेची मुलगीही तिच्या बरोबर असते. तक्रारदार महिलेच्या पतीचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या घरात रोकड असते. तसेच त्यांना भिशीही लागलेली असल्याने त्याचेही पैसे घरात होते.
तक्रारदार महिला आपल्या पतीसह गावी गेल्या असताना आरोपी महिला, ज्योती खंकाळ, त्यांच्या घरासमोर राहत होती. तक्रारदार महिलेच्या मुलीची मागील दोन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवरील “सेलेब्रिटी फेस” या आयडीवरून उमा नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. त्या महिलेनं या मुलींना चित्रपटात काम देण्याचे आश्वासन दिले.
याची माहिती ज्योती खंकाळने तक्रारदार महिलेच्या मुलीला सांगून तिला चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. ज्योती खंकाळने गोड बोलून तिला भिशीचे १ लाख ७० हजार रुपये दिले. त्यानंतर, वारंवार तिच्याकडून ५ हजार, ४ हजार असे ४२ हजार रुपये फोन पेच्या माध्यमातून घेतले. तसेच घरातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि २ ग्रॅमची सोन्याची अंगठीही नेली.
तक्रारदार महिला २० ऑक्टोबर रोजी घरी परत आल्यावर त्यांनी घरातील पैसे आणि सोने पाहिले असता ते गायब असल्याचे आढळले. मुलीकडे विचारणा केल्यानंतर तिने ज्योती खंकाळने तिला कसे फसवले याची सविस्तर माहिती दिली. ज्योती खंकाळने २ लाख ६२ हजार रुपये रोख व ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केली.
सध्या पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
