तरुणांना मारहाण, रिक्षा, कारच्या काचा फोडून दहशत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रज परिसरातील सुंदरनगरमध्ये दहशत माजवण्यासाठी गुंडांच्या टोळक्याने तरुणांना मारहाण करून रिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी सुमित मारुती पंडित (वय २७, रा. स्वामी समर्थ सदन, सुंदरनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी गणेश माळवे, यश घोडके व त्यांच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा भाऊ किरण आणि मित्र स्वप्निल हे मंगळवारी मध्यरात्री रिक्षात गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी गणेश माळवे, यश घोडके आणि त्यांचा मित्र दुचाकीवर ट्रिपल सीट येऊन अचानक त्यांच्या जवळ आले. तिघेही नशेत होते.
त्यांनी फिर्यादीला रोहित रणदिवे कोण आहे, त्याला ओळखतो का, असे विचारले व शिवीगाळ केली. त्यातल्या दोघांच्या हातात लोखंडी कोयते होते. त्यांनी फिर्यादीला मारहाण करून जखमी केले आणि तिथे पार्क केलेल्या रिक्षा व चारचाकी गाड्यांची काचा फोडू लागले.
फिर्यादीच्या आईवडिलांनी त्यांना विचारले, “तुम्ही गाड्या का फोडता?” त्यावर त्यांनी शिवीगाळ करून हत्यार दाखवून मारहाण करण्याची धमकी दिली. या घटनेत किशोर कुचेकर आणि मल्लिनाथ मळवडे यांनाही टोळक्याने मारहाण केली.
यानंतर टोळक्याने वृंदावन सोसायटी, जाधवनगर येथील रस्त्यावर पार्क केलेल्या पाच ते सहा गाड्यांच्या काचा फोडल्या. टोळक्याने हत्यार हवेत फिरवून दहशत माजवली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे करत आहेत.
