दोघांना अटक : सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भर दिवसा दुचाकीवरुन जाताना बंदुक दाखविणाऱ्या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. तो लोकांवर ही बंदुक रोखून त्यांना घाबरवित असल्याचे दिसत होते. दिवाळीसारख्या सणामध्ये भर रस्त्यावर दहशत निर्माण कणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली.
चौकशी केली तेव्हा व्हिडिओमध्ये दिसणारी बंदुक ही प्रत्यक्षात दिवाळीतील टिकल्या उडविणारी असल्याचे समोर आले आहे. अक्षय अंकुश गायकवाड (वय २७, रा. शिवणे), सुनील चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. वारजे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
हे दोघेही पेंटर असून पेंटिंगची कामे करतात.कात्रज – देहुरोड बायपास रोडवरील वडगाव पूल ते वारजे पूल दरम्यान दुचाकीवरुन दोघे जण जात होते. त्यातील मागे बसलेल्याने हातात बंदुक घेतली होती. ती तो सर्वांना दाखवत होता.
त्यांच्या मागाहून जाणाऱ्या एकाने तातडीने हा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला होता. पुणे शहरात गुंड भरदिवसा रस्त्याने बंदुक घेऊन बिनधास्त फिरत असल्याचे प्रतीत होत होते.
या व्हिडिओ दिसणार्या दुचाकीचा शोध घेऊन सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते पेंटर असून पेंटिंगची कामे करतात. व्हिडिओत दिसणारी बंदुक ही दिवाळीतील टिकल्या उडविण्यासाठीची असल्याचे निष्पन्न झाले.
परंतु, त्यांनी ती बंदुक खरी असल्याचे भासवून लोकांमध्ये भ्रम निर्माण केला. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीची भावना निर्माण झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
