पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिसराची माहिती व्हावी, यासाठी पोलिसांबरोबर बंदोबस्ताला आलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीसह रुट मार्च केला जातो, जेणेकरून अचानक काही घटना घडल्यास त्यांना परिसराची माहिती व्हावी. सीमा सुरक्षा दलासह असा रुट मार्च जात असताना जनता वसाहतीत एका रिक्षाचालकाने पोलिसांचा हा रुट मार्च अडवला व पोलिसांवर हल्ला केला. या दरम्यान, त्याच्या पत्नीने आणि आईने महिला पोलिसांच्या हाताला चावा घेतला.
याबाबत अविनाश उत्तम कांबळे (वय ३५, रा. पर्वती) यांनी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सोमनाथ दास चौधरी (वय ४०, रा. पर्वती) या रिक्षाचालकाला अटक केली आहे.
त्याची पत्नी राणी सोमनाथ चौधरी आणि आई सिताबाई दास चौधरी (रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जनता वसाहतीतील शंकर मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी ६च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पोलीस स्टेशनमधील ७ पोलीस अधिकारी, ४३ पोलीस अंमलदार, बीट मार्शल व सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी तसेच एक बुलेरो गाडी अशा स्वरूपात जनता वसाहतीत पायी रुट मार्च करत होते. रुट मार्च संपवून परत येत असताना जनता वसाहत येथे ते पोहोचले.
त्यावेळी गल्ली नं. १०८ मधून एक रिक्षाचालक जात होता. बीट मार्शल खाडे व सुर्वे यांनी त्याला बुलेरो वाहन जाण्यासाठी रिक्षा रस्त्याच्या बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र, त्याने रिक्षा बाजूला न घेता रस्त्यात आडवी लावून रस्ता अडवला व पोलिसांना शिवीगाळ केली.
पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पुन्हा शिवीगाळ करू लागला, त्यामुळे तिथे लोकांची गर्दी जमली. त्यावेळी पोलिसांनी त्याला बाजूला बोलावले. त्याने तेथे आपल्या पत्नी व आईला बोलावून घेतले.
फिर्यादी यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून त्याला रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने फिर्यादीच्या अंगावरील शर्ट फाडला. त्याचबरोबर त्याच्या पत्नी व आईने जमिनीवर पडलेला दगड उचलून पोलिसांवर फेकला, ज्यात खाडे यांच्या हाताला इजा झाली.
यानंतर, रिक्षाचालकाने अंगावरील कपडे काढून रस्त्यावर लोळायला सुरुवात केली, ज्यामुळे त्याच्या अंगावर जखमा झाल्या. महिला पोलिसांनी त्याची पत्नी व आईला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी महिला पोलिसांच्या हाताला चावा घेतला व झटापटीत पोलिसांच्या पोटाला व हाताला इजा झाली.
शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेले व अटक केली. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर धावटे करीत आहेत.