वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कॉपर वायर चोरणारी टोळी जेरबंद करण्यात वाघोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १३,४४,८१७/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीमधून १७,५१,२७५/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचे विविध कंपनींचे ७३ बंडल चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव व त्यांच्या स्टाफला गोपनीय माहिती मिळवण्याच्या आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून एक ट्रान्सपोर्ट कंपनीची पिकअप गाडी असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने कंपनीकडे विचारपूस करून गाडीचा नंबर निष्पन्न करण्यात आला.
सदर गाडीबाबत गोपनीय माहिती मिळवून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपचा वाहन चालक जमाल अब्दुल रहमान (वय ५३ वर्षे, रा. फ्लॅट नं २०१, जैस्मीन रेसीडन्सी, लेन नं ७, सातवनगर, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले.
चालकाकडे गुन्ह्याबाबत तपास केला असता, त्याने सदर गुन्हा अनिल रिखीराम गुप्ता (वय ३७ वर्षे, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, भारतनगर झोपडपट्टी, कत्तारवाडी, विश्रांतवाडी), शिवम बजरंगी कश्यप (वय २२ वर्षे, रा. टिंगरेनगर, श्रीहंसनगर, धानोरी), विशाल पप्पू कश्यप (वय २० वर्षे, रा. धानोरी, पुणे; मूळ रा. कैथंग पुरवा, थाना भाधोका, जिल्हा रायबरेली, उत्तर प्रदेश) यांच्या मदतीने केल्याचे कबूल केले.
गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी यापूर्वी २२ ऑक्टोबर रोजी लोणीकंद येथील जयवंत वेअरहाऊसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी अनिल गुप्ता यांच्या धानोरी येथील गोडावूनमधून १०,९४,११७/- रुपये किमतीच्या कॉपर वायरची एकूण ६२ बंडल जप्त करण्यात आली आहेत.
वाघोली पोलीस स्टेशनमधील आणि लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हे उघडकीस आणून चार आरोपींना अटक करून १०,९४,८१७/- रुपये किंमतीचे कॉपर वायर व २,५०,०००/- रुपये किंमतीची पोर्टर ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टिक्सची पिकअप असा एकूण १३,४४,८१७/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, गुन्हे शोध पथकाचे सपोनि शिरीष भालेराव, पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, प्रितम वाघ, आणि विशाल गायकवाड यांनी केली आहे.
