शिरूरमध्ये प. पु. आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीसाठी भाविकांची मोठी गर्दी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
शिरूर : प्रभू श्री रामलिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरूर नगरीत सध्या ‘हर हर महादेव’चा जयघोष घुमू लागला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प. पु. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून रंगणारी भव्य श्री शिव महापुराण कथा दि. २४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून, राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
दि. २४ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत हा दिव्य आध्यात्मिक सोहळा पार पडत आहे. या भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी तब्बल ३० एकरांहून अधिक क्षेत्रावर सुसज्ज व भव्य मंडप उभारण्यात आला असून, हजारो भाविक एकाच वेळी बसून कथा श्रवण करू शकतील, अशी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.
कथास्थळी उभारण्यात आलेले भव्य स्टेज आणि त्यावर साकारलेल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांच्या प्रतिकृती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. भगवान शंकराची भव्य मूर्ती व आकर्षक सजावट संपूर्ण परिसराला आध्यात्मिक तेज प्रदान करत आहे. प्रवेशद्वारावर उभारलेली भव्य शिवमूर्ती आणि सर्वत्र सुरू असलेला शिवनामाचा गजर वातावरण भक्तिमय करत आहे.
या सोहळ्याचे आयोजन P. R. Dhariwal Foundation यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, उद्योगपती आदित्य धारीवाल आणि माजी नगरसेवक विजय दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली आहे.
मंडपात पंखे, बसण्यासाठी मॅट्स, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची उभारणी तसेच मंडपाजवळ महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर भोजन, स्वच्छता, आदरातिथ्य, पार्किंग व वाहतूक नियंत्रणासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. युवक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आयोजनाला बळ देत आहे.
“हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला सदाचार, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखवणारा उपक्रम आहे. या कथेमुळे भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा मिळेल,” असे प्रतिपादन प्रकाश धारीवाल यांनी केले.
सुमारे ३० एकरांवर उभारलेला हा भव्य मंडप सध्या भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. शिरूरमध्ये प्रथमच इतक्या भव्य प्रमाणावर होत असलेल्या या धार्मिक महोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. आता अवघे शिरूर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमत असून, लाखो भाविकांच्या स्वागतासाठी शिरूरकर सज्ज झाले आहेत.
















