सिंहगडरोड पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मोक्का व इतर तीन गुन्ह्यांतील आरोपी तसेच फायरींगमधील फरार आरोपींना अटक करण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी, रवी मधुकर जाधव (रा. संजीवन अपार्टमेंट, जाधवनगर, वडगाव बु., पुणे) हा गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. दि. ६ नोव्हेंबर रोजी तपास पथकातील पोलीस अधिकारी सचिन निकम, सहायक पोलीस निरीक्षक संतोष भांडवलकर व पोलीस कर्मचारी रवी जाधवचा शोध घेत होते.
पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना माहिती मिळाली की, रवी जाधव पठारवाडी, शिंदेवाडी येथील चर्तुःमुख महादेव मंदिराच्या जवळील डोंगरावर लपून बसला आहे. सदरची माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर, त्या माहितीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि पोलीस कर्मचारी बातमीच्या ठिकाणी रवाना झाले व आरोपी रवी जाधवचा पठारवाडीजवळील चर्तुःमुख महादेव मंदिर परिसरातील डोंगराळ भागात शोध घेतला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
आरोपी रवी जाधवसोबत असलेला पाहिजे आरोपी आश्विन उर्फ बारक्या लोणारे (रा. धायरी गाव, खडक चौक, लोणार वस्ती, धायरी) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी सदरचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी रवी मधुकर जाधव याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, संतोष भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर व पोलीस कर्मचारी संजय शिंदे, उत्तम तारू, पंकज देशमुख, अमोल पाटील, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, विकास पांडुळे, विकास बांदल यांनी केली आहे.















