पाणी पट्टीचे बिल कमी करण्यास लाच मागितली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड : पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात असताना ते नियमितपणे, म्हणजे जितका पाणी वापर होईल तितके बिल काढण्यासाठी १ हजार ६०० रुपयांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागातील पाणी मीटर निरीक्षक व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर यांना सापळा रचून पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी मीटर निरीक्षक विकास सोमा गव्हाणे आणि कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर आशा कानिफनाथ चौपाली अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार यांचे पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात होते. ते नियमितपणे, म्हणजे जितका पाणी वापर होईल तितके बिल काढण्यासाठी, पाणी मीटर निरीक्षक विकास गव्हाणे याने स्वतःसाठी १ हजार रुपये आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आशा चौपाली हिच्यासाठी ६०० रुपये, असे एकूण १ हजार ६०० रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता आशा चौपाली हिने तक्रारदार यांच्या पाणीपुरवठ्याचे बिल नियमित करून देण्यासाठी स्वतःसाठी ६०० रुपये आणि विकास गव्हाणे याच्यासाठी १ हजार रुपये, असे एकूण १ हजार ६०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर, ‘ह’ प्रभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून १ हजार ६०० रुपये स्वीकारताना आशा चौपाली हिला पकडण्यात आले. त्यानंतर, चौपाली हिने विकास गव्हाणे याला तक्रारदाराकडून स्वीकारलेल्या लाच रकमेबाबत फोनवर विचारले असता, विकास गव्हाणे याने त्याच्यासाठी स्वीकारलेली रक्कम आशा चौपाली हिच्याकडे ठेवण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. या दोघांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले पुढील तपास करीत आहेत.
