५० एकर जागा, ५०० कोटी रुपये खर्च, दहा वर्षे बांधकाम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : वडगाव मावळजवळ तब्बल पन्नास एकर जागेवर भव्य जैन संस्कृती संग्रहालय उभारण्यात आले आहे. सुमारे पन्नास एकरचा भव्य परिसर आणि तब्बल पाचशे कोटी रुपये खर्च करून ज्येष्ठ उद्योजक आणि फोर्स मोटर्सचे चेअरमन अभय फिरोदिया यांनी त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त समाजाला जैन संस्कृतीवर आधारित बांधलेले अनोखे अभय प्रभावन हे संग्रहालय भेट दिले आहे.
पुणे शहरापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर, पुणे-मुंबई रस्त्यावर हे संग्रहालय उभारले आहे. या ठिकाणी जैन संस्कृतीवर आधारित अनेक वास्तुशिल्पे, संदेश देणारी म्युरल्स आणि तीर्थंकरांचे संदेश देणारे भव्य संग्रहालय साकारण्यात आले आहे.
हा परिसर इतका भव्य आहे की त्याला पूर्णपणे पाहण्यासाठी किमान तीन वेळा भेट द्यावी लागेल. वडगाव मावळ परिसरातील अभय प्रभावन संग्रहालयात ३५० कलाकृती साकारल्या गेल्या आहेत. उद्योगपती अभय फिरोदिया यांनी संग्रहालयाची माहिती देताना सांगितले की, जैन तत्त्वज्ञान आणि भारतीय वारसा यांचा मिलाप या संग्रहालयात साकारला आहे.
सलग दहा वर्षे, दोनशे कारागिरांनी सुमारे पन्नास लाख तास काम करून हे भव्य संग्रहालय साकारले आहे. अभय प्रभावन संग्रहालय इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे संग्रहालय ३.५ लाख चौरस फूट जागेत असून, वातानुकूलित आहे.
या संग्रहालयात ३५० पेक्षा अधिक अद्वितीय कलाकृतींसह ३० विशेष डिझाइन केलेल्या गॅलरी आहेत. त्यामधून सामाजिक स्तरावर सुरक्षा, उत्पादकता, समृद्धी तसेच वैयक्तिक स्तरावर करुणा, मुक्त विचारसरणी, आणि नैतिक जीवन या जैन मूल्यांचे दर्शन घडते.