जिल्ह्यात १ हजार ५४ तक्रारीं : बारामतीत फक्त ३३
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वडगाव शेरी मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या सर्वाधिक ३०२ तक्रारी आल्या आहेत. तर बारामतीत फक्त ३३ तक्रार दाखल आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून १५ ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५४ तक्रारींपैकी ९९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती तक्रार निवारण कक्ष व जिल्हा नियंत्रक कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे यांनी दिली.
सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते.
सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारी व कंसात कारवाई झालेल्या तक्रारी : आंबेगाव विधानसभा-२६ (२५), बारामती-३३ (२८), भोर-५ (२), भोसरी-७६ (७३), चिंचवड-१८ (१७), दौंड-१० (८), हडपसर-४९ (४५), इंदापूर-३८ (३७), जुन्नर-३४ (३३), कसबापेठ-१६० (१५२), खडकवासला-२१ (१७), खेड आळंदी-३ (१), कोथरूड-६ (४), मावळ-१२ (११), पर्वती-१२५ (१२५), पिंपरी-१३ (११), पुण कॅन्टोन्मेंट-५८ (५६), पुरंदर-३ (१), शिरूर-२२ (९), शिवाजीनगर-४० (४०) व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात – ३०२ (३०२) अशा एकूण १ हजार ५४ तक्रारी प्राप्त झाल्या व तथ्य आढळलेल्या ९९७ तक्रारींवर कारवाई झाली. यापैकी ९४५ तक्रारींवर पहिल्या १०० मिनीटात कार्यवाही झाली असून त्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे १८००२३३३३७२ व १९५० टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही निवडणूक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
