बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन फसवणूक, आणखी पाच अधिकार्यांच्या डिग्रीविषयी संशय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बारावी नापास असताना सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीची एम बी ए ची बनावट डिग्रीचे मार्कलिस्ट बनवून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करायला दिली. त्याला तत्कालीन शिक्षणाधिकारी व लिपिकांनी साथ दिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपिक राजेंद्र घारे व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सोमनाथ बनकर हे सध्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुधीर रामचंद्र आल्हाट (वय ५४, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे महापालिका कार्यालय येथे १ जानेवारी २००८ ते जानेवारी २०१६ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ बनकर हे सध्या महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत. ते २००८ मध्ये पुणे महानगर पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलचे रेक्टर होते.
त्यावेळी त्यांनी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीमधून २००८ व २००९ या शैक्षणिक वर्षांमध्ये एम बी ए (एच आर एम) ही बनावट डिग्री प्राप्त करुन त्यांच्या स्वत:च्या सेवा पुस्तिकेत नोंद करुन घेतली. त्यावर तत्कालिन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे यांची स्वाक्षरी आहे.
फिर्यादी यांनी या सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीमध्ये माहिती अधिकारात अर्ज केला होता. २७ डिसेंबर २०१६ रोजी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीने सोमनाथ बनकर या नावाच्या कोणत्याही विद्यार्थ्याकडून पदवी घेतली नसून ही पदवी बनावट असल्याचे कळविले आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तपास करुन सोमनाथ बनकर यांची एम बी ए ची डिग्री बोगस असल्याची खात्री करुन ही गुन्हा दाखल न करता ४ मे २०२४ रोजी पुणे महापालिकेला गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २१ एप्रिल २०१८ रोजी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना गोपनीय अहवाल पाठविला असून त्यामुळे बनकर यांची पदवी बनावट असल्याचे म्हटले आहे.
आणखी पाच अधिकारीयांच्या डिग्रीविषयी संशय महापालिकेच्या अधिकार्यांनी आसाम युनिर्व्हसिटीची बनावट डिग्री घेतल्याचा संशय आहे.
त्यांचीही चौकशी करुन बनावट डिग्रीचे रॅकेट शोधून काढावे, अशी मागणी सुधीर आल्हाट यांनी केली आहे. या अधिकार्यांची यादी त्यांनी पोलिसांना दिली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करीत आहेत.