महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मध्यरात्री पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या ग्राफिक डिझायनरला पकडून दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलिसांनी एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
केशव अशोक राठोड (वय २५, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. याबाबत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार श्रीकांत अरुण दगडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, हवालदार दत्तात्रय पवार, गणेश ढगे, श्रीकांत दगडे हे परिमंडळ १, २, ३ मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौबिंग आॅपरेशन व गुन्हे प्रतिबंधकाचे अनुषंगाने गस्त घालत होते.
तेव्हा श्रीकांत दगडे, हवालदार दत्तात्रय पवार यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की़ भुमकर चौकाकडून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडलगत साई पॅलेस लॉजच्या पुढे एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल आहे. बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथक तातडीने तेथे रवाना झाले.
शुक्रवारी साडेबाराच्या सुमारास बातमीत सांगितल्याप्रमाणे एक जण साई पॅलेस लॉजच्या अलिकडे थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने आपले नाव केशव राठोड असल्याचे सांगून ग्राफिक डिझायनर म्हणून काम करीत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ४० हजार रुपयांचे देशी पिस्तुल व एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर अधिक तपास करीत आहेत.