गळा दाबून खुन केल्याप्रकरणी तिघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारु पिऊन आईवडिलांना त्रास देतो, म्हणून तिने आपल्या मावस भावांना बोलावले. त्यांनी त्याचा खुन केला. दारुच्या नशेत थंडीत काकडून तो मेल्याचे त्यांनी गावकर्यांना सांगितले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. जवळपास या घटनेला १५ दिवस उलटून गेले. त्यानंतर आरोपीपैकी एकाचा मोबाईल बोलला आणि खुनाला वाचा फुटली. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे.
सोमनाथ रघुनाथ काळे (वय ३६, रा. नानोली, ता. मावळ) असे खुन झालेल्याचे नाव आहे. मंगेश गोविंद दाभाडे (वय ३६), तनेष साईनाथ दाभाडे (वय १९, दोघे रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ) व महिला (वय ४०, रा. ब्राम्हणवाडी ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शाम मस्के यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मावळ तालुक्यातील नानोली गावात २६ ऑक्टोंबर रोजी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ काळे हा दारु पिऊन येऊन आपल्या आई वडिलांना त्रास देतो, या कारणावरुन महिलेने आपले मावस भाऊ मंगेश आणि तनेष दाभाडे यांना घरी बोलावून घेतले होते.
दारुच्या नशेत असलेल्या सोमनाथ काळे याच्या गळावर पायाने दाबून खुन केला. त्यानंतर त्यांनी सोमनाथ काळे याचा दारुच्या नशेत थंडीमुळे काकडून मृत्यु झाल्याचे गावात सांगितले. गावकर्यांनाही त्याचा त्रासच होत असल्याने कोणीही संशय व्यक्त केला नाही.
त्यांनी सोमनाथवर अंत्यसंस्कार केले. या घटनेला १५ दिवस उलटून गेले. त्यांना वाटले आपला गुन्हा पचला. पण, कधीना कधी खुनाला वाचा फुटतेच. याबाबतही तसेच झाले.
तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी सांगितले की, सोमनाथ काळे याचा खून करताना तनेष दाभाडे याने त्याचे शुटिंग केले होते.
खुन झाल्यानंतर काही दिवस कोणालाही त्याचा संशय आला नाही. नंतर आमच्या तपास पथकाला याबाबत कुणकुण लागली. सोमनाथ काळे याचा थंडीत काकडुन मृत्यु झाला नसून त्याचा खून झाला आहे.
या खबरीनुसार पोलिसांनी तनेष दाभाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाईल तपासला तेव्हा पोलिसांना सोमनाथ काळे याला कसे मारले याचा व्हिडिओ मिळाला. त्यानुसार पोलिसांनी अन्य दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. शेवटी मोबाईलमुळे खुनाला वाचा फुटली़. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव करीत आहेत.