येरवडा, वडारवाडी, वारजे, कोंढव्यात कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तडीपार केले असतानाही शहरात येऊन खुले आमपणे रहात असून हे तडीपार गुंड दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. दररोज असे एक ते दोन तडीपार गुंडांना पोलीस पकडत आहेत़ शहर पोलीस दलाने राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकाच रात्रीत ४ तडीपार गुंडांना जेरबंद केले आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने आकाश किसन राठोड (वय ३०, रा. पांडु लमाण वस्ती, येरवडा) याला तडीपाराचा भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी आकाश राठोड याला ३१ डिसेबर २०२३ रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार केले होते.
या आदेशाचा भंग करुन तो येरवड्यातील चिमा घाट पर्णकुटी येथील सार्वजनिक ठिकाणी थांबलेला पोलिसांना आढळून आला होता. वडारवाडी येथील पांडवनगरमधील एसआरए बिल्डिंग समोर थांबलेला तडीपार गुंड लवकुश रामअधिल चौहान (वय २२, रा. एसआरए बिल्डिंग, पांडवनगर) याला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने पकडले.
त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २० सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस उपायुक्त हिमंत जाधव यांनी २ वर्षांकरीता तडीपार केले होते. या आदेशाचा भंग करुन तो पुन्हा घरी रहायला आला होता.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील अंमलदार साईकुमार कारके यांना तडीपार गुंड पियुष ऊर्फ कान्हा सतिश जाधव हा घराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक त्याची खातजमा करण्यासाठी त्याच्या घराजवळ पोहचले.
त्यांनी पियुष ऊर्फ कान्हा सतिश जाधव (वय २०, रा. वारजे जकात नाका) याला ताब्यात घेतले. त्याला यावर्षी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तरी तो शहरात आल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने मनोज राजू सोनटक्के (वय २९, रा. कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर) याला तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी पकडले. पोलीस उपायुक्त आर राजा यांनी मनोज सोनटक्के याला २० एप्रिल २०२४ पासून एक वर्षाकरीता तडीपार केले होते. असे असतानाही तो पुन्हा घरी आला होता.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाने कोंबिंग ऑपरेशन आयोजित केले होते. त्यात हे तडीपार गुंड शहरातच रहात असल्याचे आढळून आले आहे.