सीबीआयच्या नावाने घातला गंडा, डिजिटल अरेस्टचा फंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तुमच्या आधार कार्डचा वापर करुन बनावट बँक खाते उघडून त्यातून मनी लॉड्रिंग झाले असून तुम्हाला अटक करण्यात येत असल्याचे सांगत एका आय टी इंजिनिअरची तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत पाषाण येथे राहणाऱ्या एका ५९ वर्षाच्या आय टी इंजिनिअरने सायबर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार ९ ते १९ नोव्हेंबर दरम्यान घडला आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आय टी इंजिनिअर असून पत्नी व मुलीसह राहतात. त्यांना ९ नोव्हेंबर रोजी एक फोन आला.
त्यात सीबीआयकडून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावावर मनी लॉड्रिंग करण्यात आले आहे. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तुम्हाला अटक होऊ शकते, असे सांगून त्यांना भिती दाखविण्यात आली. त्यांना व्हिडिओ कॉल करुन सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासविले.
त्यानंतर तुमचे वय पाहता तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करीत असल्याचे सांगितले. व्हिडिओ कॉल बंद करायचा नाही़ कोणाला याबाबत काही सांगायचे नाही, अशा प्रकारे त्यांना धमकाविण्यात आले. त्यांनी त्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला मी असे काही केले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा तुमचा त्यात सहभाग नसल्याचे सटीफिर्केट देण्यासाठी तुमच्या बँक खात्याची तपासणी करावी लागेल, असे सांगून बँक खात्यातील रक्कम वेगवेगळ्या खासगी बँकेत ट्रान्सफर करायला भाग पाडले.
घाबरलेल्या फिर्यादीने ही बाब कोणाला सांगितली नाही. ते पैसे ट्रान्सफर करायला बँकेत गेले तरी त्यांनी व्हिडिओ कॉल सुरु ठेवला होता. आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक, इंडसिंड बँक, यस बँक अशा बँकांच्या खात्यात त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
त्यांनी आपली सर्व शिल्लक, मुदत ठेवीचे पैसे असे एकूण ६ कोटी २९ लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतरही त्यांच्याकडून पैसे परत मिळाले नाही. त्यांनी संपर्क तोडल्यावर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. अशा प्रकारे मनी लॉड्रिंगची भिती दाखवून फसवणूक केली जात असल्याबाबत जनजागृती केली जात असली तरी फिर्यादी यांनी आपल्याला याची माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.
केवळ कामावर लक्ष केंद्रीत केल्याने पेपर वाचन, बातम्या पाहत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे अधिक तपास करीत आहेत.