महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांचं नातं ‘गणपती बाप्पा मोरया’ असंच अखंड आहे. पुण्यात गणपती बाप्पा आणि त्याचे भक्त मोरया गोसावी चिंचवडला, अशीच स्थिती होती. पुण्यात राहायचं आणि पिंपरी-चिंचवडला नोकरीला जायचं. मी १९८६ पासून पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम व्यवसायात आहे. मला हे शहर कसं मोठं झालं, टाटाचा संप, स्वनिवृत्ती योजना, कंपन्यांचे चाकण एमआयडीसीमध्ये शिफ्टिंग, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयटी पार्क हिंजवडीत आलं, हे सगळं जवळून पाहायला मिळालं. यामुळे पुन्हा गणपती बाप्पा मोरयाचं नातं उजळून निघालं.
बाप्पाचा मूषक (उंदीर) कॉम्प्युटरच्या माऊसच्या रूपात आला आणि जगाच्या इतिहासात केवळ ऑटोमोबाईल हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवडला, पुण्याबरोबर आयटी हब म्हणूनही ओळख मिळाली.
जगात उच्च स्थानावर असलेल्या इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, पर्सीस्टंट अशा कंपन्यांनी पुणे गाठलं कारण इथं शिक्षण हब, बुद्धीदेवता आणि आयटी पार्कसाठी आवश्यक असणारं प्रशिक्षित मनुष्यबळ सहज उपलब्ध झालं. संपूर्ण भारतातून शिक्षणासाठी आलेली मुलं येथेच स्थायिक झाली.
पिंपरी-चिंचवडमधील २७ गावांचा समूह हळूहळू विस्तारत गेला. प्राधिकरण ही पीसीएमसीची शान होती. मात्र आयटी पार्कमुळे पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख, ताथवडे, तळवडे, चिखली अशी भागं वाढत गेली आणि कालची खेडी शहरांपेक्षाही आंतरराष्ट्रीय पातळीची कशी बनली, हे कळलंच नाही.
पवना नदीचं पाणी दोन्ही बाजूंना, डिफेन्स एका बाजूला आणि पुण्याच्या वाढीसाठी जागा मर्यादित असल्याने, पाण्याचा प्रश्न कधीच उद्भवला नाही. १९९०-९५ पर्यंत ‘पीसीएमसी’मध्ये मल्टिप्लेक्स नव्हते; ते मी बांधलं. मॉल नव्हते; ते मी सुरू केले.
आज मात्र पुण्याच्या तुलनेत घरासाठी प्राधान्य दिलं जातं, ते पीसीएमसीलाच. व्यावसायिक, उद्योग, मॉल जे काही सुरू करायचं असतं, त्यासाठी प्राधान्य आहे, ते पीसीएमसीला. आणि आता या पीसीएमसीला नवीन दिशा देत आहे मेट्रो. पीसीएमसीला मेट्रो सिटी बनवण्यासाठी आता वेळ घालवण्याचं कारणच नाही.
आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांनी एकत्रित लक्ष घातलं, तर ऑटोमोबाईल हब, आयटी हब, आणि एज्युकेशन हब अशी तीनही क्षेत्रांची जोड असलेलं जगातलं एकमेव शहर बनेल.
माझ्या गणपतीच्या मोरयाचं पिंपरी-चिंचवड, जिथं शिस्त आहे, संस्कृती आहे, शिक्षण आहे, मॉल आहेत, गावाचं गावपण आणि शहराचं शहरपण, तिन्ही एकत्र असणारे हे शहर विमानतळाचं केंद्र बनलं, तर जगातील सर्वात मोठं आणि उत्पन्नाचं प्रचंड साधन असणाऱ्या शहरांमध्ये गणलं जाईल.
या बाबतीत कोणतीही शंका येणार नाही, कारण बाप्पाचा ‘माऊस’ आणि ‘मोरया’ हे शहर चालवतायत.















