महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले असतानाही पुण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार मुसा टोळीतील प्रमुखाला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
मुसा ऊर्फ मुसेफ वजीर थोरपे (वय २२, रा. नूर मौहल्ला गल्ली, दिघी रोड, भोसरी) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार फुलपगारे, हवालदार अमोल आवाड, लहू सूर्यवंशी, पोलीस अंमलदार मयूर भोकरे हे फरारी आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा हवालदार अमोल आव्हाड व मयूर भोकरे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेला गुन्हेगार मुसा हा शास्त्री रोडवरील बैजू हॉटेल येथे आल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी या बातमीची खातरजमा करुन मुसा थोरपे याला पकडले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक फौजदार रवींद्र फुलपगारे, हवालदार अमोल आवाड, लहू सूर्यवंशी यांनी केले आहे.