चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील घटना : वाहनांच्या काचाही फोडल्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चतु:श्रृंगी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांत जप्त केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून, १ लाख १० हजार रुपयांचे टायर आणि हेड/टेल लॅम्प चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून, सहायक फौजदार सूर्यकांत इनामदार यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांत जप्त केलेल्या साहित्य व वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी मुद्देमाल कारकुनांवर असते. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याजवळील विद्यापीठातील विद्यार्थी सुविधा केंद्राच्या मागील जागेत जप्त केलेली वाहने ठेवली होती. मात्र, या वाहनांवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला.
या हल्ल्यात चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच दोन चारचाकी वाहनांचे आठ टायर आणि पाच वाहनांचे हेड/टेल लॅम्प असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.
