धाडसी आणि जबाबदार कृतीचे सर्वत्र कौतुक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, स.पो.नि. दिलीप विष्णू ढेरे यांच्या तत्परतेने आणि धाडसपूर्ण कृतीने एका अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि सेवाभावाचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
दिनांक ३ डिसेंबर रोजी रात्री एक वाजता स.पो.नि. दिलीप ढेरे पांगरी पोलीस ठाण्याच्या चार्जमुळे तिथून परत येत असताना पुण्याहून सांजाला जाणारी कार (क्रमांक एमएच १२ पीएम ५२८०) रस्त्याच्या कडेला पलटी झालेली त्यांनी पाहिली.
ढेरे यांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली व कारमध्ये अडकून पडलेल्या तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या या वेळेवर घेतलेल्या योग्य निर्णयामुळे आणि कार्यक्षमतेमुळे अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचला.
या कार्याचे त्या ठिकाणी उपस्थित नागरिक आणि स्वतः अपघातग्रस्त तरुणाने विशेष कौतुक केले आहे. दिलीप ढेरे यांची धाडसी कृती पोलिसांच्या कर्तव्यभावनेला अधोरेखित करते तसेच समाजासाठी तत्पर मदतीसाठी पोलीस सज्ज असतात, हे सिद्ध करते. त्यांची ही कृती समाजासाठी प्रेरणादायी असून पोलिसांच्या जबाबदारीची आणि संवेदनशीलतेची ओळख निर्माण करणारी ठरली आहे.
