हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे ; फुरसुंगी परिसरातील शेतकरी सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी फाटा, मांजरी फॉर्म) यांचे सोमवारी अपहरण करण्यात आले. ही घटना शेवाळवाडी येथील फुरसुंगी फाटा येथे सकाळी सहाच्या सुमारास घडली. घटनेला जवळपास १२ तास उलटून गेले असले, तरी अद्याप त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही किंवा अपहरणकर्त्यांनी कोणताही संपर्क साधलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ हे सकाळी सहाच्या सुमारास घरातून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. फुरसुंगीच्या दिशेने जात असताना, क्रीम रंगाच्या शेवरलेट एन्जॉय गाडीतून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. गाडी फुरसुंगीच्या दिशेने निघून गेली.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले की, सतीश वाघ हे शेती व्यवसाय करत होते. ते पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना ही घटना घडली.
या अपहरणानंतर अपहरणकर्त्यांनी अद्याप कोणताही संपर्क केलेला नाही. तसेच, वाघ यांचे कोणाशी वाद किंवा आर्थिक व्यवहार असल्याचेही आढळून आलेले नाही. त्यामुळे या अपहरणामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. वाघ यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
