साथीदाराच्या सहाय्याने स्वारगेट परिसरात केल्या होत्या चोर्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तडीपार केले असतानाही वारंवार शहरात येऊन दमदाटी करणाऱ्या तसेच जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी पकडले़ त्याच्याकडून दीड लाख रुपयांचे ६ मोबाईल हस्तगत केले आहेत.
प्रतिक विजय माने (वय २४, रा. डेरे बंगला, मांजरी, मुळ रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. प्रतिक माने याला पोलीस उपायुक्त आर राजा यांनी १३ एप्रिल २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार करण्यात आले होते.
असे असताना तो वारंवार शहरात येत असे. नोव्हेंबर महिन्यात मंगळवार पेठेत आपल्या साथीदारासह कोयता घेऊन आला होता व लोकांना धमकी देत गोंधळ घालत होता. स्वारगेट परिसरात प्रवाशांच्या हातातून मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटना वारंवार होत असल्याने स्वारगेट पोलिसांचे तपास पथक परिसरात गस्त घालत़ सीसीटीव्हींची तपासणी करत असताना पोलीस अंमलदार सुजय पवार, फिरोज शेख व हर्षल शिंदे यांना बातमी मिळाली की, एक संशयित आरोपी हा कात्रज पीएमटी बसस्टॉपजवळ फिरत आहे.
त्यानुसार तातडीने पोलिसांनी तेथे जाऊन प्रतिक माने याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ ३ मोबाईल आढळून आले. त्यातील एक मोबाईल स्वारगेट एस टी बसस्थानकासमोरुन चोरीला गेल्याचे दिसून आले.
अधिक चौकशीत त्याने साथीदार करण घाडगे (रा. मांजरी) यांनी मिळून स्वारगेट व हडपसर परिसरातून आणखी ३ मोबाईल हिसकावून चोरी केल्याचे सांगितले.
हे मोबाईल ओळखीच्या लोकांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आणखी ३ मोबाईल हस्तगत केले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, हवालदार अश्रुबा मोराळे, सचिन तनपुरे, मारकड, प्रतिक लोहिगुडे, पोलीस अंमलदार सुजय पवार, हर्षल शिंदे, फिरोज शेख, दुधे, रमेश चव्हाण, प्रशांत टोणपे, दिपक खेंदाड, संदीप घुले यांनी केली आहे.
