महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवार, १० डिसेंबर रोजी चारे गावच्या हद्दीत म्हसोबाची वाडी तलावा शेजारी बिबट्याने बोकडावर हल्ला केला. मात्र, शेतकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बोकडाचा जीव वाचवण्यात यश आले.
घटनेनुसार, धनाजी कात्रे हे त्यांच्या २८ शेळ्या व बोकडे शेताजवळ चरायला घेऊन गेले होते. भरदुपारी बिबट्याने अचानक येऊन एका बोकडावर हल्ला केला. बोकडाच्या आरडाओरडीनंतर शेतकरी धोत्रे यांनी तातडीने हातातील कुऱ्हाड फेकून बिबट्यावर वार केला.
बिबट्याने बोकडाच्या पायाला धरले असतानाच इतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व काठ्यांनी मार करत बिबट्याला पळवून लावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून आठ दिवसांपूर्वी उपळाई ठोंगे येथेही बिबट्याने चार शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या घटनेत शेतकऱ्यांनी दाखवलेले धाडस आणि एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळला. परंतु बिबट्याचा वाढता वावर पाहता शेतकऱ्यांनी अधिक सावध राहावे, तसेच वन विभागाने बिबट्याच्या हलचालींवर नियंत्रण ठेवावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
