माजी आमदार राहुल मोटे यांचे प्रशासनाला निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारी वीज रात्रीच्या ऐवजी दिवसा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, परांडा, भूम, आणि वाशी तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला मोठा धोका निर्माण झाला आहे. याआधी देखील बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे निवेदन देण्यात आले होते, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
या भागातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्वारी, गहू, हरभरा आणि ऊस यांसारख्या पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जावे लागते. बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना सोयीस्कर वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दिवसा वीज उपलब्धतेसाठी
माजी आमदार मोटे यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, रात्रीच्या लाईटच्या वेळा बदलून दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी. यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामे अधिक सुलभपणे करता येतील आणि बिबट्याच्या संभाव्य धोक्यांपासून बचाव होईल. दिवसा वीजपुरवठा केल्यास सिंचन आणि अन्य शेती कामे सुरळीत पार पडतील, असेही त्यांनी नमूद केले.
