महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : मौजे मात्रेवाडी (ता. भूम) येथे गुरुवारी (दि. १२) पहाटे ४.१५ वाजता बिबट्याने शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला. या घटनेत विजय सोमनाथ माने गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
विजय माने व त्याचा भाऊ सागर माने हे बुधवारी रात्री त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. गट क्रमांक १२७ मधील पिकाला पाणी सोडून ते दोघे एकाच ठिकाणी झोपले. पहाटे सागर माने उठून पाण्याचा प्रवाह योग्य ठिकाणी पोहोचतो आहे का, हे पाहण्यासाठी ५०-६० फूट अंतरावर गेला असता, झोपलेल्या विजय माने याच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला.
गंभीर जखमी विजय माने याला तातडीने भूम येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधीही भुम येथील एमआयडीसी परिसरात गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे वनविभागाने तातडीने बट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत.
