व्यसनाधीन रुग्णाला घेऊन जातानाचा केसनंदमधील घटना : रुग्णवाहिकेची तोडफोड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दारुच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी एक व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रुग्णवाहिका घेऊन त्याला त्याच्या नातेवाईकांनी आर्यन बिअर बारसमोर आणले. मात्र, दारुच्या नशेत असलेल्या त्याच्या साथीदारांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत घेऊन जात असताना चालक व सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर तिघांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करून ती तोडफोड केली. वाघोली पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
याबाबत, सुधाकर अरुण कानडे (वय ३५, रा. कात्रज) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी विशाल रामदास कोलते (रा. बकोरी, ता. हवेली), संदिप कैलास हारगुडे (रा. केसनंद, ता. हवेली) आणि अमोल हारगुडे (रा. केसनंद, ता. हवेली) यांना अटक केली आहे.
ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता केसनंद येथील आर्यन बिअरबारसमोर घडली. विशाल कोलते याच्या घरावर झडती घेतल्यावर पोलिसांनी १६ जिवंत काडतुसे आणि दोन रिकाम्या पुंगळ्या हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन बिअर बारमध्ये विशाल कोलते आणि संदिप हारगुडे हे दोघे दारु पित बसले होते.
यावेळी संदिप हारगुडे याच्या नातेवाईकांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानुसार रुग्णवाहिका घेऊन फिर्यादी आणि त्याचे सहकारी आर्यन बिअर बार बाहेर आले. रुग्णाला रुग्णवाहिकेत घेऊन जात असताना, संदिप हारगुडे याने विरोध दर्शवला आणि विशाल कोलते याला चिथावणी दिली.
त्यानंतर, विशाल कोलते याने त्याच्याकडील पिस्टलमधून दोन गोळ्या झाडल्या आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, तिघांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली आणि तिची तोडफोड केली.
वाघोली पोलिसांनी तिघांवर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.















