मुंढव्यात सराफ व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लूट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंढवा येथील बी.टी. कवडे रोडवरील अरिहंत ज्वेलर्समध्ये सराफ व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटणाऱ्या दोन चोरट्यांची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. ही घटना ८ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती.
फिर्यादी वालचंद आचलदास ओसवाल (वय ७७) हे रात्री दुकानात दिवसभराचा हिशेब लिहित बसले होते. त्याच वेळी दोन चोरटे दुकानात आले. त्यांनी दुकानाचे अर्धे शटर खाली ओढून एकाने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या चेहर्यावर स्प्रे मारला, तर दुसरा सोन्याचे दागिने गोळा करू लागला.
ओसवाल यांनी विरोध केला असता, चोरट्याने लोखंडी हत्याराने त्यांच्या डाव्या खांद्यावर मारहाण केली. या दरोड्यात दोघांनी २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून पलायन केले.
फिर्यादी वालचंद ओसवाल यांना चोरट्यांचे चेहरे आठवत असल्याने आणि दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे तयार केली आहेत. मागील आठ दिवसांत चोरट्यांचा शोध लागलेला नसल्याने, पोलिसांनी ही रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
या रेखाचित्रांतील चोरट्यांविषयी काही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याला तातडीने कळवावे, असे आवाहन मुंढवा पोलिसांनी केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे गुन्हेगारांना पकडणे शक्य होईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.















