विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : द पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित हरिभाई व्ही. देसाई कनिष्ठ महाविद्यालयात ‘जलसा’ सांस्कृतिक सप्ताहाचा उद्घाटन सोहळा शनिवार, १४ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात पार पडला.
सांस्कृतिक सप्ताहाचे उद्घाटन द पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी स्पर्धांतील विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचे अनावरणही करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक सप्ताहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेश शहा यांनी विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमांचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उप-प्राचार्या डॉ. राजश्री पटवर्धन, विभाग प्रमुख श्वेता परदेशी, पर्यवेक्षिका स्मिता तेंडुलकर, पर्यवेक्षिका डॉ. मंजू राकेश, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा नरके यांनी केले, तर आभार प्रदर्शन जया शिंगोरे यांनी केले. ‘जलसा’ सांस्कृतिक सप्ताह विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कलागुणांना वाव देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.















