सोने तारण ठेवून कर्ज काढले : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सायबर गुन्हेगारांनी शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने पाषाण येथील ४१ वर्षीय महिलेला तब्बल १९.६६ लाख रुपयांना फसवले. हुंडाई कंपनीचा आयपीओ (IPO) लागल्याचा बहाणा करत त्यांनी महिलेकडून सोने तारण ठेवून कर्ज घेत पैसे जमा करायला लावले. मात्र, ना त्यांना हुंडाईचे शेअर्स मिळाले, ना पैसे परत.
या प्रकरणी महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी “व्हीआयपी ए ८ स्टॉक मार्केट विनर” या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अनोळखी क्रमांकावरून “व्हीआयपी ए ८ स्टॉक मार्केट विनर” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले.
ग्रुपचा अॅडमिन दिवाकर सिंग याने महिलेला शेअर ट्रेडिंगमध्ये ४० टक्के नफा होतो, असे सांगून विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्यांनी महिलेला ५०,००० रुपये गुंतवण्यास सांगितले. त्यानंतर एसीएमआर नावाचा स्टॉक खरेदी करण्याचे सूचित केले.
महिलेला सुरुवातीला २३,००० रुपयांचा नफा दाखवून आणखी पैसे भरण्यास भाग पाडले. १८ नोव्हेंबर रोजी दिवाकरने महिलेला सांगितले की, हुंडाई कंपनीचा आयपीओ लागला असून, १३२२ शेअर्ससाठी २५.९१ लाख रुपये भरावे लागतील.
एवढी रक्कम नसल्यामुळे महिलेला सोने तारण ठेवून व कर्ज काढून १२.११ लाख रुपये जमा करायला भाग पाडले. त्यानंतर आणखी १३ लाख रुपये भरण्यास सांगितले गेले, तेव्हा महिलेला फसवणुकीचा संशय आला. यामुळे तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या घटनेची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बालकोटगी करत आहेत. सायबर फसवणुकीचा हा प्रकार गंभीर असून, लोकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्याआधी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

















