रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना मारहाण करून लुटणाऱ्या तडीपार गुंडाला त्याच्या दोन साथीदारांसह लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकली व मोबाईलसह ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
छोट्या ऊर्फ अभिषेक शिवाजी आल्टे (वय २३, रा. बाबाजान चौक, कॅम्प), अमर विशाल खरात (वय १९, रा. साईबाबा मंदिरासमोर, कॅम्प) आणि जयेश गणेश भिसे (वय १९, रा. लक्ष्मीमाता मंदिरामागे, काशेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी १५ डिसेंबर रोजी रात्री खासगी ट्रॅव्हल बसने लातूरहून पुण्यात आले होते. गांधी बसस्टॉपजवळ उतरून ते पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली आणि मोबाईल जबरदस्तीने लुटून नेला.
लष्कर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपींचा शोध घेतला आणि तडीपार गुंड अभिषेक आल्टे व त्याच्या साथीदारांना अटक केली. चौकशीत त्यांच्या कडून लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यातील दोन मोटारसायकली व मोबाईलसह ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, गुन्हे निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे आणि ज्योती कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदीप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, सागर हराळ, अल्का ब्राम्हणे, श्रीनिवास केंजळे, भगवान पाटोळे आणि रवींद्र कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
