दोघांनी एका कैद्याला मारहाण करुन केले जखमी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चेष्टा मस्करी करताना झालेल्या वादातून दोघा कैद्यांनी खुनाचा आरोपाखालील कैद्याला बेदम मारहाण केली. कैद्याच्या बरगडी व नाकावर ठोसा मारल्याने तो जखमी झाला आहे.
सुधीर गौतम थोरात असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंगाधिकारी कारागृह रक्षक विश्वास नरहरी वाकडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विकी ऊर्फ विवेक राजेश खराडे व अली अदम शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विकी ऊर्फ विवेक राजेश खराडे (वय २०, रा़ कामाठीपुरा, शिरुर) हा ऑगस्ट २०२४ पासून येरवडा कारागृहात आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी तळेगाव दाभाडे परिसरात सहा ठिकाणी हवेत गोळीबार करुन दहशत माजविली होती. सुधीर गौतम थोरात (वय ३४, रा़ सदाशिव पेठ) हा खुन प्रकरणात ऑगस्ट २०२२ पासून येरवडा कारागृहात आहे.
आखाड पार्टी साजरी करताना झालेल्या भांडणातून आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी (वय ३२, रा. पर्वती दर्शन) याचा सुधीर थोरात व त्याच्या मित्रांनी खून केला होता. येरवडा कारागृहातील बी यार्डात या आरोपींना ठेवण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी साडेतीन वाजता याडार्तील १ नंबर लाईनजवळ हे तिघे असताना विकी व अली यांनी सुधीर याला कधी सुटणार असे चेष्टा मस्करीत विचारले. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. त्याचा राग मनात धरुन दोघांनी सुधीर थोरात याला हाताने मारहाण केली. बरगडीवर व नाकावर मारुन जखमी केले.
हा प्रकार पाहताच कारागृह रक्षकांनी सुधीर थोरात याला कारागृहातील रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले अधिक तपास करीत आहेत.
