मुदत ठेवीवरही ओव्हरड्राफ्ट करुन काढली रक्कम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ज्येष्ठ नागरिकाला बँकेचे केवायसी करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून त्यावर डेबिट कार्डचा पिन टाकायला सांगितला. त्यांनी पिन नंबर टाकल्याबरोबर काही मिनिटात ४९ व्यवहार करुन त्यांच्या खात्यावरुन तब्बल १३ लाख ३२ हजार ५९६ रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करुन फसवणूक करण्यात आली.
याबाबत मयूर कॉलनीत राहणार्या ६९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा कापड व्यवसाय आहे. त्यांना एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. त्याने बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या खात्याची केवायसी करावी लागेल अन्यथा खाते बंद होईल, असे सांगितले. त्यांना बँकेतून फोन आला असे वाटले.
त्यांना एक लिंक पाठविण्यात आली. त्यांनी लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना काही प्रोसेस करण्यास सांगितले. त्यांना बँकेच्या डेबिट कार्डचा पिन नंबर टाकण्यास सांगितले. त्यांनी त्याप्रमाणे पिन नंबर टाकला. त्यावर त्याने तुमचे केवायसी होऊन जाईल असे सांगितले. त्यांना संशय आल्याने ते बँकेत गेले. तोपर्यंत त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १२ व्यवहार केले गेले.
त्यानंतर त्यांच्या मुदत ठेवीवर ओव्हड्राफ्ट करुन त्यावरुनही पैसे ट्रान्सफर केले गेले. अशा प्रकारे त्यांच्या खात्यातून ४९ व्यवहार करुन १० लाख ५७ हजार ५९६ रुपये ट्रान्सफर केले गेले. तसेच फिर्यादी यांची आई (वय ९६) हिचे खातेही त्यांच्या मोबाईलला लिंक होते. त्या खात्यावरही ११ व्यवहारातून २ लाख ७५ हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करीत आहेत.















