केसनंद फाटा येथील मध्यरात्रीची घटना, तिघांचा मृत्यु
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अमरावती येथून कामाच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या व फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना मद्यधुंद डंपरचालकाने चिरडले. त्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यु झाला असून त्यात दोन बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे. ही घटना वाघोलीतील केसनंद फाट्यावर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
वैभवी रितेश पवार (वय १वर्ष), वैभव रितेश पवार (वय २वर्ष), विशाल विनोद पवार (वय २२) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. या अपघातात ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
जानकी दिनेश् पवार (वय २१), रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादु भोसले (वय ९), नगेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८), आलिशा विनोद पवार (वय ४७) अशी जखमींची नावे आहेत.
डंपरचालक गजानन शंकर तोटरे (वय २६, रा. नांदेड) याला अटक करण्यात आली आहे. अपघातातील फुटपाथवर झोपलेले हे अमरावती जिल्ह्यातील राहणारे आहेत.
अमरावतीहून ४० जण कामाच्या शोधासाठी कुटुंबासह पुण्यात आले होते.
चार वर्षापूर्वी हे कामगार पुण्यात कामाला आले होते. पुण्यात काम मिळते म्हणून ते येतात. ते इथेच राहतात. यंदा ते रविवारीच अमरावतीहून आले होते. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते फुटपाथवर झोपी गेले होते. फुटपाथवर सगळे आपल्या कुटुंबासह इकडे तिकडे झोपले होते.
साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून आलेला डंपर सरळ फुटपाथवर घुसल्याने एकच आरडाओरडा झाला. डंपरने मुलांना चिरडले. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता. या अपघाताची माहिती समजल्यावर पोलिसांनी तातडीने जखमींना ससून रुग्णालयात रवाना केले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसर्या बाजूला १५ ते १६ जण झोपले होते. डंपर जर तिकडे गेला असता तर आणखी मोठा अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.















