सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भीमथडी जत्रेत रविवारची सुट्टी असल्याने पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी एका महिला बचत गटाच्या स्टॉलवरुन ७१ हजार रुपयांची रोकड लांबविली. पण याची चोरी पचली नाही़ सीसीटीव्हीमध्ये यांची चोरी कैद झाली होती. पोलिसांनी या गर्दीतून चौघा चोरट्यांना पकडले.
मनोज भगतसिंग पवार (वय ४१), संदीप संजय गौड (वय ३२), रतिलाल प्रेमलाल परमार (वय ५५), विकी राजू साळुंखे (वय ३५,सर्व रा. येडा चौक, जामखेड, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत वाईमधील एका २८ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार सिंचननगर येथील भीमथडी जत्रेत रविवारी सायंकाळी पाच वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा भीमथडी जत्रेत महिला बचत गटाचा स्टॉल आहे. स्टॉलवर कुर्रडया, पापड, लोणची यांची विक्री करण्यात येत आहे. रविवारी जत्रेत खूप गर्दी झाली होती.
यावेळी त्यांनी आतल्या बाजूला ठेवलेल्या बॉक्समधून चोरट्यांनी ७१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी स्टॉलवरील सीसीटीव्ही पाहिले. तेव्हा रोकड चोरताना चोरटे त्यात कैद झाले होते. त्यावरुन त्यांनी भीमथडी जत्रेतील असणार्या या चोरट्यांना पकडले.
भीमथडी जत्रेत शुक्रवारी एका महिलेच्या स्टॉलमधून ७० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या महिलेचा कपड्यांचा स्टॉल आहे. त्या ग्राहकांना कपडे दाखवत होत्या. त्यावेळी हँगरला लावून ठेवलेल्या कपड्यांच मागे कोपर्यामध्ये पर्स ठेवली होती. पर्समध्ये ७० हजार ५५० रुपये रोख व पेनड्राइव्ह होता. चोरट्यांनी ही पर्स लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करीत आहेत.
