जामनगरच्या तरुणाकडे आढळल्या ५०० व १०० रुपयांच्या बनावट नोटा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मेडिकलच्या दुकानात बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील एका तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे ५०० व १०० रुपयांच्या ७७,१०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या.
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. डिफेन्स कॉलनी, जामनगर, गुजरात) असे आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार लखन गंगाधर शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार शुक्रवारी रात्री अकरा वाजता रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळील मेडिकल दुकानाजवळ घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली की, एका व्यक्तीकडे बनावट नोटा आहेत आणि तो त्या वटविण्याचा प्रयत्न करत आहे.
पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवत, मेडिकल दुकानाबाहेर थांबलेल्या गौरवला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या १४२ बनावट नोटा आणि १०० रुपयांच्या ६१ बनावट नोटा सापडल्या. त्याचसोबत त्याच्याकडे २,६५० रुपयांच्या १९ खर्या नोटाही आढळल्या. प्राथमिक तपासात उघड झाले की, बनावट नोटा वटवून मिळालेले पैसे त्याने स्वतःकडे ठेवले असावेत. गौरव जामनगर येथे हेल्पर म्हणून काम करत होता. शुक्रवारीच तो पुण्यात आला होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव करत असून, या बनावट नोटा गौरवपर्यंत कशा पोचल्या आणि त्याला त्या कोणी पुरवल्या, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
















