महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास प्लस योजने अंतर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. पुण्यातील आयसीएआर अटारी, शिवाजीनगर येथे आयोजित किसान सन्मान दिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आयसीएआरचे सहायक महासंचालक डॉ. संजय कुमार सिंह, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कृषीमंत्री चौहान यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस अंतर्गत महाराष्ट्रात २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६.३७ लाख पक्की घरे वितरित केली जातील.
त्यानंतर १३.२९ लाख नवीन घरांसाठीही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एकूण १९.६६ लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण होईल. राज्यातील गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळाल्याने महाराष्ट्र देशातील सर्वाधिक घरे बांधणारे राज्य ठरेल.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. पीक कर्जासाठी तरतूद २५ लाख कोटींपर्यंत वाढवली असून, अन्नधान्याच्या किमान आधारभूत किंमतीत दुप्पट वाढ केली आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा, असे आवाहन चौहान यांनी केले.
कार्यक्रमात शेतकऱ्यांसह ग्रामविकास योजनांचे लाभार्थी सहभागी झाले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही नैसर्गिक शेती, यांत्रिकीकरण, व सामूहिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
