मोबाईल चोरट्यांनी तरुणाला नेले होते ३०० मीटर फरफटत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मोबाईल चोरत असताना त्याला प्रतिकार केल्याने चोरट्याने तरुणाला ३०० मीटर फरफटत नेऊन चावा घेऊन जखमी केले होते. या चोरट्यांचा शोध घेताना हडपसर पोलिसांनी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासून चोरट्यांना अटक केली.
मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), रोहित किरण वाणी (वय २१)आणि कृष्णा संजय वाणी (वय २०, दोघे रा. ताडीगुप्ता चौक, धायरकर वस्ती, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी हे डी पी रोडवरुन भगीरथीनगर सोसायटीकडे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तिघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्याचा प्र्रयत्न केला. त्याला त्यांनी विरोध केल्यावर चोरट्यांना त्यांना तसेच ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले.
त्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला तसेच दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली. गाडीवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादीस हाताला चावून जखमी केले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याचे घटनास्थळ असलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाहिले. त्यामध्ये तीन संशयित दिसून आले.
या संशयितांचा माग काढत सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्या आधारे तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल व त्यासाठी वापरलेली दुचाकी असा ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी उपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मांढरे, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, सचिन जाधव, दिपक कांबळे, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांनी केली आहे.
