नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : ९ जणांना अटक, ५ वाहने जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नववर्षाचे स्वागत मद्यपानाने करण्याचा जणू रिवाज पडल्यामुळे या दिवशी मद्यविक्रीत मोठी वाढ होते. या संधीचा फायदा घेत गोवा राज्यात तयार होणाऱ्या मद्याचा तसेच बनावट मद्याचा अवैध वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
हे लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गस्त वाढवली. या मोहिमेदरम्यान दोन ठिकाणी कारवाई करत तब्बल १ कोटी २० लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच ९ आरोपींना अटक करत विदेशी मद्याच्या १६६८ बाटल्या आणि ५ वाहने जप्त केली आहेत.
विशेष म्हणजे, दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून फ्रूट पल्पच्या नावाखाली मद्य पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. सासवड पथकाने एका संशयित वाहनातून गोवा बनावटीचे मद्याचे ३ बॉक्स जप्त केले.
वाहनचालकाकडे चौकशी केली असता, नसरापूर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. तेथे एका व्यक्तीला अशोक लेलंड ट्रकमधून मद्याचे बॉक्स उतरवताना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान, ट्रकमध्ये वीटभट्टीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या पावडरखाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे बॉक्स सापडले.
या मद्याचे थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून फ्रूट पल्पच्या नावाखाली गुजरात आणि इतर ठिकाणी पाठवले जात होते. या ठिकाणी अशोक लेलंड सहा चाकी ट्रकसह गोवा बनावटीच्या १७१० बाटल्या, इतर साहित्य आणि वाहनांसह एकूण ५१ लाख ९५ हजार १७० रुपयांचा माल जप्त केला.
या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. निरीक्षक एस.एस. बरगे, दुय्यम निरीक्षक पी.एम. मोहिते, एस.सी. शिंदे, संदीप मांडवेकर, सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे, ऋतिक कोळपे आणि बाळू आढाव यांनी सहभाग घेतला.
दुसरी कारवाई निगडी येथील भक्ती शक्ती चौकाजवळ करण्यात आली. गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य आणि बिअर एका खासगी बसमधून आणले जात असल्याचे आढळले. लक्ष्मी क्वीन ट्रॅव्हल कंपनीच्या बसमधून विदेशी मद्याच्या १२६ बाटल्या आणि बडवायझर बिअरच्या २४ बाटल्या सापडल्या.
या मालाची किंमत ६८ लाख ३७ हजार ७३० रुपये आहे. हा साठा खडकी औंध रोडवरील खडकी स्टेशनजवळ वितरित केला जाणार होता. या ठिकाणी जाऊन ५ आरोपींना ताब्यात घेतले, तसेच दोन दुचाकी वाहने आणि सहाचाकी बस जप्त करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सांगर धोमकर, अधीक्षक चरणसिंग बी. राजपूत, उपअधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १ कोटी २० लाख ३२ हजार ९०० रुपयांचा मद्यसाठा आणि ५ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
