कंपनीच्या कर्मचार्याचे कृत्य २० टक्के हिस्सा आणि २५ लाख रुपयांची मागितली खंडणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अॅक्सिस बँकेसाठी संपूर्ण भारतात कलेक्शन सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या एका कर्मचार्याने कंपनीचा मास्टर पासवर्ड, बँकेचा डेटा आणि कामगारांची माहिती चोरून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कंपनीत २० टक्के हिस्सा आणि २५ लाख रुपयांची मागणी केली आहे.
सुब्रमण्यम अरुणमुघम कोनार (वय ४४, रा. पॅलेडिअम, एक्झॉटिका, माधवनगर, धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी श्रवण अजित कोरडे (रा. मधुकाश अपार्टमेंट, धायरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रेडियंट कॅप्टिव्ह इंडिया प्रा. लि., साकोरेनगर, विमाननगर येथील कार्यालयात २०२० ते १४ जुलै २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, रेडियंट कॅप्टिव्ह ही कंपनी अॅक्सिस बँकेसाठी भारतभर कलेक्शन सर्व्हिसेस पुरवते. आरोपी श्रवण कोरडे याने कंपनीत काम करत असताना मास्टर पासवर्ड, बँकेचा गोपनीय डेटा आणि कर्मचाऱ्यांचा डेटा चोरला. नोकरीवरून काढून टाकल्यानंतर कोरडे याने कंपनीचे भागीदार महेश कोलमकर यांना व्हॉट्सअॅप कॉल करून पाच लाख रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने दिली. यानंतर कोरडे याच्याशी कंपनीने चर्चा केली, परंतु त्याने २० टक्के कंपनीत हिस्सा आणि २५ लाख रुपये देण्याची मागणी ठेवली. पैसे न दिल्यास कंपनीचा डेटा सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.
कोरडे याने कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचे ई-मेल आयडीचे पासवर्ड स्वतःकडे घेतले आणि बदलले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम ठप्प झाले. शेवटी, कंपनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.
