सोलापूर तालुका पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत पथकाने एका मोठ्या कारवाईत 30 लाख 25 हजार रुपये किंमतीचा चोरीस गेलेला जेसीबी मशीन कर्नाटक राज्यातील यादगीर जिल्ह्यातून हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
दि. 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30 ते दि. 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान, फिर्यादी विश्वराज लालु राठोड (रा. ति-हे तांडा, ता. उत्तर सोलापूर) यांच्या मालकीचा, क्रमांक MH-13-EK-6076 असलेला जेसीबी मशीन चोरीस गेला होता. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीस गेलेला जेसीबी कर्नाटक राज्यात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाला कर्नाटक राज्यात रवाना करण्यात आले. पथकाने बोमनहल्ली (ता. सुरपुर, जि. यादगीर, कर्नाटक) येथे शोध घेतला असता, चोरीस गेलेला जेसीबी आणि दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या तपासात त्यांनी तिसऱ्या साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली. दि. 01 जानेवारी 2025 रोजी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना सोलापूर न्यायालयात हजर केले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अशा प्रकारच्या इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी चौकशी सुरू असून, गुन्हे प्रकटीकरण पथकाला अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार आणि सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी सहभागी होते.
